Ad will apear here
Next
जिंदगी ख्वाब है....
जुन्या काळात अनेक चित्रपट आपल्या लाजवाब अभिनयाच्या मोत्यांनी सजवलेले कलावंत म्हणजे मोतीलाल राजवंश. चार डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदराच्या आजच्या भागात आस्वाद घेऊ या मोतीलाल यांच्या सुंदर अभिनयाने नटलेल्या नि शैलेंद्र यांनी लिहिलेल्या ‘जिंदगी ख्वाब है’ या गीताचा...
...........
१९६५ या वर्षातील १७ जूनला मोतीलाल यांचे निधन झाले! म्हणजे ५५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या या कलावंताबद्दल सध्याच्या पिढीतील चित्रपटप्रेमींना फारशी माहिती नसणार! परंतु चित्रपट जाणकार आणि मागील पिढीमधील चित्रपटप्रेमींना मोतीलाल म्हणजे कोण याची कल्पना असेलच! हिंदी चित्रपटसृष्टीत सतत नवीन कलावंत येत असतात, आपल्या अभिनयाने विविध भूमिका साकार करत असतात. १०५ वर्षांच्या आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत असे असंख्य कलावंत येऊन गेले आहेत! त्यापैकी एक म्हणजे मोतीलाल हे जरी खरे असले, तरी हा अभिनेता म्हणजे अभिनयाचा मेरूमणी होता. चार डिसेंबर १९१० हा त्यांचा जन्मदिवस.

तसे पाहता अशोककुमार व मोतीलाल यांची कारकीर्द बरोबरच सुरू झाली. अशोककुमार बॉम्बे टॉकीज या चित्रसंस्थेचा पगारी नोकर होता, तर मोतीलाल रणजित या चित्रसंस्थेत होता. अशोककुमारची नायिका अनेक वेळा देविकाराणी अगर लीला चिटणीस असायची, तर मोतीलाल खुर्शीद अगर शोभना समर्थ या नायिकांबरोबर दिसायचा! पण आश्चर्य म्हणजे मोतीलाल त्याच्या पूर्ण कारकिर्दीत कधीही देविकाराणी अगर लीला चिटणीसबरोबर दिसला नाही. तसेच अशोककुमारनेही खुर्शीद अगर शोभना समर्थबरोबर काम केले नाही.

सहजगत्या केलेला उच्च दर्जाचा अभिनय हे मोतीलाल यांचे वैशिष्ट्य होते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वतःला कोणत्याही साचेबद्ध भूमिकेत बंदिस्त करून घेतले नव्हते. आचार्य अत्रे यांच्या ‘संशयकल्लोळ’ नाटकावरून तयार केलेल्या ‘तसबीर’ या चित्रपटात मोतीलाल हे नायक होते, तर अशोककुमार-नलिनी जयवंत यांची भूमिका असलेल्या ‘काफिला’मध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. ‘तकदीर’ या चित्रपटाद्वारे नर्गिस नायिका म्हणून प्रथमच पडद्यावर झळकली. या ‘तकदीर’मध्ये नर्गिसचा पहिला नायक मोतीलाल होते. 

नर्गिसचा विषय निघाला, की राज कपूर आठवतो! राज कपूरच्या उत्तम अभिनयाचे दर्शन घडणारे दोन चित्रपट म्हणजे ‘अनाडी’ आणि ‘जागते राहो’! पण या दोन्ही चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका करूनही मोतीलाल यांनी राज कपूरपेक्षा कणभर सरस अभिनय केला होता. ‘अनाडी’मधील त्यांचा संवाद ‘एक अनाडी के सामने मैं अपनी हार नही मानूंगा!’ हे वाक्य एका वेगळ्या अर्थाने खरेच होते.

राज कपूरच नव्हे, तर दिलीपकुमार, अशोककुमार यांच्या बरोबरीने मोतीलाल यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली होती. चित्रपटप्रेमींनी त्याचा भरपूर आस्वाद घेतला! सावन, प्रतिज्ञा, लीडर, देवदास असे मोतीलाल यांचे चित्रपट त्यांच्या अभिनयाकरिता म्हणून पाहावेत. आणि या चित्रपटांखेरीज ‘मिस्टर संपत’ आणि ‘परख’ या चित्रपटातील भूमिका तर एकदम वेगळ्याच आणि मोतीलाल यांच्यातील निष्णात अभिनेत्याचे दर्शन घडवणाऱ्या होत्या! पहिला स्मृतिभ्रंश झालेला नायक मोतीलाल यांनी ‘परदेसी’ चित्रपटात रंगवला होता.

आपल्या चित्रपट कारकिर्दीतून मिळवलेला सर्व पैसा खर्च करून मोतीलाल यांनी ‘छोटी छोटी बातें’ हा चित्रपट निर्माण केला होता. दुर्दैवाने रसिकांना तो भावला नाही. त्या चित्रपटासाठी गाणी लिहिणाऱ्या शैलेंद्रसारखीच अवस्था चित्रपट निर्मितीच्या बाबतीत मोतीलाल यांची झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मोतीलाल यांचे निधन झाले. अशा या मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेल्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे मी चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधू इच्छित आहे.
 
राज कपूर यांचा ‘जागते रहो’ हा चित्रपट! त्यामध्ये मोतीलाल यांनी एका मद्यपीची भूमिका केली होती. या चित्रपटात समाजातील विविध प्रकारचे लोक, त्यांचे वर्तन आणि विचार यांचे दर्शन घडवले गेले आहे. आणि त्यामधून दिसणारा विरोधाभासही चित्रपट बघताना आपणाकडे जाणवतो. त्या अनुषंगाने असणारे कथानक, दृश्ये, संवाद या सर्वांचा विचार करून दिग्दर्शक एका गीताच्या सुरुवातीलाच संत कबीर यांचा एक दोहा प्रेक्षकांपुढे ठेवतो.

होय! रसिकहो, मुकेश यांनी गायलेले, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि शैलेंद्र यांनी लिहिलेले ‘जागते रहो’ या चित्रपटातील हे गीत आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल; पण त्याच्या सुरुवातीला मुकेश यांच्या स्वरात ज्या दोन ओळी आहेत, त्यांचा अर्थ उलगडून सांगण्याचे काम माझे स्नेही सेवानिवृत्त न्यायाधीश बग्गा साहेब यांनी केले आणि त्यामुळेच या गीताचे व ओघानेच दिग्दर्शक शंभू मिश्रा (आणि राज कपूरसुद्धा) यांचे कौशल्य लक्षात येते. आपण हे गीत पाहतो तेव्हा असे दिसते, की तहानलेला नायक पाणी कोठून मिळेल याची वाट बघतो आहे आणि त्या वेळी काही अंतरावरून एक मद्यपी अडखळत चालत येत आहे. तो एक चांगल्या पोशाखातील, सभ्य दिसणारा सुखवस्तू माणूस आहे. (मोतीलाल यांनी ही व्यक्तिरेखा रंगवली आहे.) पण तो मद्यसेवनामुळे नीट चालू शकत नाही! मुळात आधी हाच विरोधाभास! 

आता हा छान पोशाखातील मद्यधुंद झालेला सुखवस्तू माणूस गाणे गायला सुरुवात करतो आणि त्यातून आपले मनोगत सांगतो; पण त्या गीताची सुरुवात संत कबीरांच्या दोह्याने करतो! म्हणजे हा अजून एक विरोधाभास! आता हा दोहा निवडतानाही केवढी कल्पकता दाखवली आहे, हे आपणाला त्या दोह्याचा भावार्थ व मथितार्थ समजून घेतल्यावरच जाणवते.

मुकेश यांच्या स्वरातील त्या गीताची सुरुवात अर्थात तो दोहा असा आहे, की -

रंगी को नारंगी कहे, बने दूध को खोया 
चलती को गाडी कहे, देख कबिरा रोया 

काय आहे या ओळींचा अर्थ? संत कबिरांची रचना म्हणजे निश्चितच अर्थपूर्ण, आशयसंपन्न असणार! कशी ते बघा - संत कबीर म्हणतात, या जगात कसे आहे बघा की, जे रंगीत आहे, ज्यावर रंग आहे, त्याला म्हणतात नारंगी! रंग नसलेला! तसेच दूध (बनवले) उकळून घट्ट केले गेले, की त्याला म्हणतात खवा! हिंदीमध्ये खोया – ‘खोया’चा अर्थ हरवलेला! दूध कोठे हरवलेले असते? ते खव्याच्या रूपात असते; पण त्याला ‘खोया’ म्हणायचे! आता पुढच्या ओळीत पाहा, जमिनीत गाडली गेलेली म्हणजे ‘गढी हुई’ म्हणजे जमिनीवर उभी असलेली! पण ती चालत असेल तर तिला गाडी म्हणायचे! असे हे सारे विरोधाभास आणि हे जग विरोधाभासाने भरलेले आहे, हे पाहून कबीर रुदन करतो. 

संत कबीरांच्या रचनेतील हा गर्भितार्थ ‘जागते रहो’च्या कथानकाला साजेसा होता. त्यामुळेच हा दोहा गाऊनच मग गाणे सुरू होते. जीवनातील, जगातील हा विरोधाभास पाहून सामान्य माणसाला प्रश्न पडतो, की हे जग म्हणजे नेमके काय आहे? हे मानवी जीवन नेमके काय आहे? अध्यात्मिक ग्रंथांमध्ये याला ‘माया’ म्हटले आहे! आणि गीतकार शैलेंद्र या काव्यात जीवनाला स्वप्नाची उपमा देतो. मुकेश गातो - 

जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या 
और भला सच है क्या?

मुकेशच्या स्वरातील या ओळीनंतर मोतीलाल यांच्या आवाजात ‘सब सच है’ हे शब्द ऐकायला येतात व गीत पुढे जाते. मानवी जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. आणि एकदा जर ते स्वप्न मानले, तर स्वप्नात खोटे काय नि खरे काय? पुढे कवी म्हणतो – जीवनात आम्ही जे वागलो, त्याबद्दल आम्हाला विचाराल तर - 

दिल ने हम से जो कहा हम ने वैसा ही किया 
फिर कभी फुरसत से सोचेंगे बुरा था या भला

आमच्या हृदयाने/मनाने आम्हाला जसे सांगितले, तसे आम्ही केले. (त्याबद्दल मी आता काय सांगू? बघू) जर कधी वेळ मिळाला, तर आम्ही जे वागलो, ते चांगले होते की वाईट होते याचा विचार करू!

एक मद्यपी हे गीत गातो. त्यामुळेच तो पुढे म्हणतो -

एक कतरा मय का जब पत्थर के होठोंपर पडा
उसके सीने में भी दिल धडका ये उसने भी कहां 

येथे पुन्हा मोतीलाल यांच्या आवाजात ‘क्या?’ असा प्रश्न व नंतर पुढे ‘जिंदगी ख्वाब है’ ही ओळ! मद्याचा एक थेंब जेव्हा दगडाच्या ओठांवर पडला, तेव्हा त्या पाषाणहृदयातही खळबळ माजली व त्यानेही सांगितले, की जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. म्हणजे तत्त्वज्ञानीही जीवनाला स्वप्न मानतात व मद्यपीही तेच सांगतो! एवढेच नव्हे, तर तो पुढे असेही म्हणतो, की -

एक प्याली भर के मैंने गम के मारे दिल को दी 
जहर ने मारा जहर को मुर्दे में फिर जान आ गयी

दु:खाने पिचलेल्या, मृतवत झालेल्या मनाला मी मद्याचा एक चषक पाजला आणि बघा काय आश्चर्य घडले ते? अहो, एका विषाने दुसरे विष मारले. (दुःखरूपी विष मद्यरूपी विषाने मारले) आणि मृतवत जीवनात चैतन्य पसरले.

शैलेंद्रच्या गीताचा हा सरळसरळ दिसणारा अर्थ! पण मद्याचा गुणगौरव करण्यासाठी शैलेंद्रने निश्चित हे गीत लिहिले नसणार याची खात्री आहे. यामधील गर्भितार्थ आहे तो जाणकारांकडून जाणून घ्यायला हवा, जसा सुरुवातीच्या संत कबिरांच्या दोह्यात आहे तसा! या गीताला जोडून तो दोहा घेत असताना कदाचित दिग्दर्शकाला असाही विरोधाभास दाखवायचा असेल, की बघा, एक मद्यपीसुद्धा जीवनावर केवढे भाष्य करतो. 

असो! मोतीलाल यांचा या गीतामधील अभिनय लाजबाब आहे. असे अभिनयाचे विविध मोती मागे ठेवून हा कलावंत या जगातून गेला! या ‘सुनहऱ्या’ गीताचा आस्वाद घेऊन त्याच्या स्मृतींना अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZYACH
Similar Posts
सब कुछ सीखा हमने... शोमॅन राज कपूर आणि संवेदनशील गीतकार शैलेंद्र हे दोघे खास मित्र. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जन्मदिन, तर शैलेंद्र यांचा मृत्युदिन, हा एक विचित्र योगायोगच. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या शैलेंद्र यांनी राज कपूर यांच्या ‘अनाडी’ चित्रपटासाठी लिहिलेल्या या सुंदर गीताचा... सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी
जाऊँ कहाँ बता ऐ दिल हिंदी चित्रपटसृष्टीत होऊन गेलेला रेहमान हा एक चांगला चरित्र अभिनेता. अनेक महत्त्वाच्या चित्रपटांत त्याने लक्षात राहण्यासारख्या भूमिका केल्या होत्या. पाच नोव्हेंबर हा त्याचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’ या गाण्याबद्दल...
याद न जाए बीते दिनों की... अभिनेते राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिन (१२ जुलै) नुकताच होऊन गेला, तर २० जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘याद न जाए बीते दिनों की...’ या गाण्याचा...
आ नीले गगन तले... गीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language